शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील समन्वयातून संशोधनाला चालना देणे ही काळाची गरज : मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे, आयसर : शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक दृढ करून संशोधन व नवोपक्रमाला चालना देणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सोलापूर येथील एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या वतीने आयसर (IISER), पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या ‘रिजनल रिसर्च सिम्पोजियम ऑन प्रोजेक्ट अँड प्रॉब्लेम-बेस्ड लर्निंग’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत उच्च शिक्षणावरील प्रादेशिक संशोधन परिषदेचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या आणि संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान न राहता त्यांच्यात संशोधनवृत्ती, चिकित्सक विचार आणि प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता विकसित व्हावी, यासाठी अशा परिषदा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात.”
पुढे विश्वास व्यक्त करताना पाटील म्हणाले की, “शिक्षण क्षेत्रातील संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योगविश्वाच्या नेमक्या गरजा यांची योग्य सांगड घालणारे सकारात्मक विचारमंथन या तीन दिवसीय परिषदेतून नक्कीच घडेल.” या परिषदेमुळे विद्यार्थी व संशोधकांना एक उत्तम व्यासपीठ मिळाले असून, त्यातून देशाला उपयुक्त ठरणारे नवे संशोधन पुढे येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रोपरचे संचालक प्रा. राजीव आहुजा, डेन्मार्कमधील अलबोर्ग विद्यापीठाच्या युनेस्को पीबीएल सेंटरच्या संचालिका प्रा. क्झियानग्यून डू, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचे संस्थापक-कुलगुरू डॉ. गोपाळ कृष्ण जोशी, संचालक राघवेंद्र चाटे आदी मान्यवर उपस्थित होते.