कोथरूडच्या लेकींची योगसाधनेतून यशाची गगनभरारी; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून १६ गुणवंत मुलींचे अभिनंदन

17

पुणे : धुळे येथे आयोजित महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेच्या सहाव्या ‘महाराष्ट्र योगशिक्षक संमेलनांतर्गत’ पार पडलेल्या राज्यस्तरीय योग स्पर्धेत कोथरूडमधील ‘मानसी प्रेरणा फाउंडेशन’च्या मुलींनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने विशेष यश संपादन केले आहे. या स्पर्धेत घवघवीत यश मिळवून कोथरूडचा नावलौकिक वाढवणाऱ्या सर्व १६ गुणवंत मुलींचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना ना. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “कोथरूडमधील प्रत्येक वस्तीमध्ये अनेक गुणी आणि प्रतिभावान मुले-मुली आहेत. त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना योग्य दिशा, प्रशिक्षण आणि संधी मिळाल्यास ती निश्चितच मोठी भरारी घेऊ शकतात, हा माझा ठाम विश्वास आहे. याच विचारातून ‘मानसी प्रेरणा फाउंडेशन’च्या माध्यमातून अशा गुणवंत मुलींना घडविण्याचे आणि त्यांना विविध व्यासपीठांवर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी देण्याचे काम सातत्याने सुरू आहे.”

मुलींनी मिळवलेले हे यश त्यांच्या कठोर मेहनतीचे, जिद्दीचे आणि योग्य मार्गदर्शनाचे फलित असून, ते केवळ त्यांच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे तर संपूर्ण कोथरूडसाठी अभिमानाची बाब ठरले आहे. या स्पर्धेसाठी मुलींना उत्तम प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षक उल्का अलकुंटे, तन्वी फाटक, गौरी पाटील आणि सविता गोटूरकर यांचे यावेळी विशेष अभिनंदन करण्यात आले. तसेच, फाउंडेशनच्या संचालिका मुग्धा भागवत यांचे या मुलींच्या जडणघडणीतील मोलाच्या योगदानाबद्दल मनःपूर्वक कौतुक करण्यात आले. कोथरूडच्या या लेकींची यशाची भरारी अशीच उंचावत राहो आणि त्यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या नकाशावर कोथरूडचे नाव अधिक उज्ज्वल होवो, अशा सदिच्छा पाटील यांनी व्यक्त केल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.