मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला कोथरूडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दुष्काळग्रस्तांसाठी पाषाणच्या ‘जय भवानी ट्रस्ट’कडून १० टन धान्य रवाना

8

पुणे : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आवाहनाला कोथरूडमधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या आवाहनाला साथ देत पाषाणमधील ‘जय भवानी ट्रस्ट’ने लोकवर्गणीतून तब्बल १० टन धान्य खरेदी केले असून, मदतीची ही पहिली खेप बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील दुष्काळग्रस्त गावांसाठी रवाना झाली आहे.

राज्यात सध्या दुष्काळामुळे शेतकरी आणि ग्रामीण जनता मोठ्या संकटात आहे. शासन स्तरावर मदत सुरू असली तरी समाजानेही पुढे यावे, यासाठी ना. पाटील यांनी कोथरूडकरांना आवाहन केले होते. तसेच, दुष्काळग्रस्तांना स्वस्तात आणि थेट मदत मिळावी यासाठी ‘समुत्कर्ष ग्राहक पेठे’तून ५० टक्के सवलतीत धान्य उपलब्ध करून देण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमात ‘जय भवानी ट्रस्ट’ने पुढाकार घेत माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले आहे.

या उपक्रमाचे कौतुक करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “संकटात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची आपल्या कोथरूडची जुनीच ओळख आहे. ‘जय भवानी ट्रस्ट’ने दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी अत्यंत कौतुकास्पद आहे. इतरही नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी या लोकचळवळीत सहभागी होऊन दुष्काळग्रस्त बांधवांना आधार द्यावा, हीच नम्र विनंती!”

Get real time updates directly on you device, subscribe now.