दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभागातून मदतीचा हात; कोथरूडमध्ये ५० टक्के सवलतीत धान्य उपलब्ध
पुणे : एल निनोचा प्रभाव आणि पावसातील तूट यामुळे राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. या शासकीय प्रयत्नांना लोकसहभागाची जोड देत कोथरूडमधील समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, या उपक्रमांतर्गत कोथरूडमधील स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण सोसायट्या आणि नागरिकांनी निधी संकलित करावा. या निधीच्या माध्यमातून निम्म्या दरात धान्य उपलब्ध करून दिले जाईल.
कोविड संकटाच्या काळात ज्याप्रमाणे शहरी नागरिकांनी एकजुटीने मदतीचा हात पुढे केला, त्याचप्रमाणे सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीतही दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शहरी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या सामाजिक उपक्रमासाठी समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असा विश्वासही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.