कोथरूडमध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका साकार; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप

24

पुणे : कोथरूडमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोल्हापूरच्या धर्तीवर कोथरूडमध्येही एक सुसज्ज अभ्यासिका साकारण्यात आली आहे. या संकल्पनेला मूर्त स्वरूप मिळत असताना मनाला विशेष आनंद आणि समाधान लाभत असल्याची भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

ही अभ्यासिका पाटील यांचे विद्यार्थी परिषदेतील सहकारी दिवंगत श्रीपाद ढेकणे यांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करण्यात आली आहे. याविषयी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “कोल्हापूरमध्ये साकारलेल्या अभ्यासिकेच्या संकल्पनेतून कोथरूडमध्येही अशीच एक अभ्यासिका सुरू करण्याचा विचार माझ्या मनात होता. दिवंगत श्रीपाद ढेकणे यांच्या स्मृतींना समर्पित ही अभ्यासिका म्हणजे त्यांच्या आठवणी जपण्याबरोबरच नव्या पिढीच्या स्वप्नांना दिशा देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.”

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शांत, सुसज्ज आणि पोषक वातावरणात अभ्यास करता यावा, त्यांच्या मेहनतीला योग्य व्यासपीठ मिळावे आणि प्रशासकीय सेवेत जाण्याचे त्यांचे स्वप्न साकार व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या अभ्यासिकेतून अनेक गुणवंत विद्यार्थी घडतील आणि आपल्या कर्तृत्वाने समाज व राज्याच्या विकासात मोलाचे योगदान देतील, असा ठाम विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न त्यांच्या यशस्वी वाटचालीत महत्त्वाचा टप्पा ठरो, अशा सदिच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.