लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होणे ही पंतप्रधान मोदींच्या कार्याची पोचपावती असून अवघ्या देशासाठी अभिमानास्पद बाब – चंद्रकांत पाटील
पुणे : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी या पुरस्काराची घोषणा नुकतीच पत्रकार परिषदेमध्ये केली. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची १०३वी पुण्यतिथी असून या निमित्त पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींना दिला जाणार आहे. पुरस्काराचे यंदाचे ४१वे वर्ष आहे.
मोदी यांचे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी नाव जाहीर झाल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन केले आहे. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या कार्यकर्तृत्वाने जागतिक स्तरावर देशाला गौरव प्राप्त करून दिला आहे. देशपातळीवरही ते करत असलेले कार्य स्तुत्य आहे. यावर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार त्यांना जाहीर होणे ही त्यांच्या कार्याची पोचपावती असून अवघ्या देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. मा. पंतप्रधान मोदीजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन असे या पोस्ट मध्ये पाटील यांनी म्हणाले आहेत .
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली आहेत. देशवासीयांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन देशाला जागितक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे. या कार्यासाठी ट्रस्टच्या विश्वस्तांनी मोदींच्या नावाची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली असल्याचे सांगण्यात आले. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आल्याचे रोहित टिळक यांनी सांगितले.