उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले स्व. मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे दर्शन
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सर कार्यवाहक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी यांचे मंगळूर मध्ये निधन झाले. गेल्या अनेक दिवसापासून प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांचे पार्थिव पुण्याच्या मोतीबाग येथील संघ कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे चंद्रकांत पाटील यांनी आज मोतीबाग येथे स्व.मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
स्व.मदनदास देवी यांनी आपलं जीवन राष्ट्र सेवेसाठी आणि संघ कार्यासाठी व्यतीत केले होते . आयुष्यातील 70 वर्षे हुन अधिक काळ त्यांनी संघाचा प्रचार आणि प्रसारासाठी काम केलं. संघाकडून ते भाजपचे राजकीय निरीक्षक म्हणूनही कार्य करत होते. मागील आठवड्यात पाटील यांनी बंगळूर येथे जाऊन इस्पितळात त्यांच्या प्रकृतीची विचारपूर केली होती. मदनदास देवी यांच्या निधनाने देशातील अनेक कार्यकर्त्यांनी पितृतूल्य व्यक्तिमत्त्व गमावले असून त्यांची साधी राहणी, उच्च विचार आणि कृतिशील व्यक्तिमत्त्व, येणाऱ्या असंख्य पिढ्यांना आदर्श व प्रेरणा देत राहील अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.