पुणे येथील आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रात ‘हेल्थकेअर’, ‘जर्मन भाषा’ आणि ‘AI’ अभ्यासक्रम तातडीने सुरू होणार; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
मुंबई : आज मुंबईतील ‘सिंहगड’ या शासकीय निवासस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली NSDCI, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि पुण्याच्या ‘यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर, पुणे येथील आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्राची महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत सध्या सुरू असलेल्या हॉटेल मॅनेजमेंट व ब्युटी अँड वेलनेस अभ्यासक्रमांव्यतिरिक्त, ‘हेल्थकेअर’ आणि ‘जर्मन भाषा’ हे जागतिक दर्जाचे नवीन अभ्यासक्रम तातडीने सुरू करण्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी महत्वपूर्ण चर्चा केली.
तसेच ॲमेझॉनच्या सहकार्याने सायबर सिक्युरिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) यांसारखे ‘फ्युचर स्किल्स’ अभ्यासक्रम समाविष्ट करण्याचे निश्चित केले. महाराष्ट्रातील युवकांना परदेशात मोफत रोजगार संधी मिळवून देण्यासाठी प्रशासनाने या उपक्रमाची गतीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश यावेळी पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. प्रमोद नाईक, NSDCI चे सल्लागार डॉ. संदीपसिंह कौरा आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या प्रतिनिधी अमृता तेंडुलकर व पवन शर्मा उपस्थित होते.