राज्यातील सर्व शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी तातडीने सविस्तर प्रस्ताव सादर करा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

6

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात तंत्रशिक्षण विभागाची विशेष आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत विभागातील प्रलंबित विषय विनाविलंब आणि गतीने निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील प्राध्यापक भरती प्रक्रिया वेगवान करण्याच्या व राज्यातील सर्व शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी तातडीने सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी प्रशासनाला दिल्या. यासोबतच मुंबईतील नामांकित व्ही.जे.टी.आय. (VJTI) संस्थेला एकात्मिक विद्यापीठाचा दर्जा देण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी वेणूगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, सहसचिव संतोष खोरगडे, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहासंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.