विद्यार्थ्यांच्या तक्रारी आता एका क्लिकवर; ‘ई-निरसन’ डिजिटल प्रणालीचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते थाटात उद्घाटन
मुंबई : मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘ई-निरसन’ या अत्याधुनिक डिजिटल प्रणालीचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंगळवारी संपन्न झाले.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, कुलगुरू डॉ. राजनीश कामत, परीक्षा नियंत्रक डॉ. नरेंद्र जाधव आणि कुलसचिव डॉ. शेष यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने होणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना उत्तम सेवा देण्याचा आमचा हा प्रयत्न असून, यामुळे शैक्षणिक प्रशासनात मोठी सुसूत्रता येईल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
या प्रणालीचे काही संभाव्य फायदे पुढीलप्रमाणे :-
वेळेची बचत : तक्रारींसाठी विद्यापीठात प्रत्यक्ष जाण्याची गरज भासणार नाही.
पारदर्शकता : आपल्या तक्रारीवर काय कारवाई झाली, हे विद्यार्थी ऑनलाइन ट्रॅक करू शकतील.
त्वरीत निकाल : डिजिटल स्वरूपामुळे प्रशासकीय कामात वेग येईल.
डिजिटल युगात अशा प्रकारची पावले उचलल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील अडथळे दूर होण्यास मोठी मदत होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (रायगड) हे राज्यातील तंत्रशिक्षणाचे प्रमुख केंद्र असून, या नवीन उपक्रमामुळे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.