पुणे : सर्वत्र दिवाळीची धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. या दिवाळीत एक विशेष आकर्षण असतं ते म्हणजे दिवाळी पहाट. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मधील कर्वेनगर भागात नगरसेवक सुशील मेंगडे यांच्या माध्यमातून आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमास उपस्थित राहुन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
आजच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात पराग माटेगावकर यांच्या टीमने सादर केलेली गाणी ऐकून सर्व कर्वेनगरवासीय भारावून गेले. विशेष म्हणजे, यावेळी ‘मधुबन में राधिका नाचे रे’ या गाण्यावरील सितार वादक प्रसाद गोंदकर यांनी दिलेल्या साथीने सर्वांच्याच काळजाचा ठाव घेतला. चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. गोंदकर यांच्या असामान्य कलेला दाद आणि पाठीवर शाबासकीची थाप म्हणून पाटील यांनी त्यांचे घड्याळ त्यांना भेट दिले.
या कार्यक्रमासोबतच कोथरुडकरांची दिवाळी पहाट सुमधुर गायकीने व्हावी, यासाठी दैनिक पुढारीच्या वतीने ‘सूर दीपावली’चे हा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित शैनक अभिषेकी, विदुषी सावनी शेंडे यांचे स्वर्गीय स्वर मनाला तृप्त करणारे होते, असे पाटील म्हणाले.