बविआचा आकडेवारीचा खेळ; विजयाचा दावा फेल!
विरार / संजय राणे : पालघर लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार, असा विश्वास बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर व संघटक सचिव अजीव पाटील यांनी मतदान आकडेवारीचा खेळ करत व्यक्त केला आहे. बहुजन विकास आघाडीची पालघर लोकसभा मतदार संघात साडेचार लाख मते आहेत. या बळावर त्यांनी हा ठाम आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या वाट्याला काय येते? हे पाहायचे तर मागील निवडणुकांतील आकडेवारीवर दृष्टीक्षेप टाकावा लागेल. त्यातून आकडेवारीतील गंमत लक्षात येईल; किंबहुना त्यांचा दावा फोल ठरावा.
2009 मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण 15,23,061 मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या 7,32,587 होती. या जागेवरून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार जाधव बळीराम सुकूर विजयी झाले आणि खासदार झाले. त्यांना एकूण 2,23,234 मते मिळाली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ॲड. चिंतामण वनगा एकूण 2,10,874 मतांसह दुसऱ्या स्थानावर होते. त्यांचा 12,360 मतांनी पराभव झाला होता.
2014 मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण 15,78,149 मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या 9,92,618 होती. या जागेवरून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ॲड. चिंतामण वनगा विजयी झाले आणि खासदार झाले. त्यांना एकूण 5,33,201 मते मिळाली. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम सुकूर जाधव 2,93,681 मतांसह दुसऱ्या स्थानावर होते. त्यांचा 2,39,520 मतांनी पराभव झाला होता.
त्यानंतर ॲड. चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे झालेल्या 2018 पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित निवडून आले होते. त्यांना त्या वेळी 2,72,782 मते मिळाली होती. शिवसेनेचे उमेदवार ॲड. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना 2,43,210 मते मिळाली होती. तर बळीराम जाधव यांना त्या वेळी 2,22,838 इतकी मते होती. काँग्रेसचे दामोदर शिंगडा यांना 47,712, तर माकपच्या किरण गहला यांना 71,887 इतक मते मिळाली होती. श्रीनिवास वनगा यांना भाजपने तिकीट नाकारले होते; मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांना तिकीट दिले. पराभूत झाल्यानंतरही त्यांना पुन्हा विधानसभेत तिकीट देऊन आमदार केले व आपला शब्द राखला. या निवडणुकीत सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते. हे इथे लक्षात घ्यायला हवे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या आकडेवारीचा हाच खरा तर पाया असायला हवा.
पण 2019च्या आकडेवारीचा आधार आमदार हितेंद्र ठाकूर यांनी घेत हा विश्वास दाखवला आहे. त्या वेळी बहुजन विकास आघाडीसोबत महाविकास आघाडी (आठवले गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप) होती, हे आमदार हितेंद्र ठाकूर यांना विसरता येणार नाही. शिवाय 2009 साली बविआला गोदाताई परुळेकर मंचने पाठिंबा होता, हेही त्यांना आठवून घ्यायला हवे.
2019 मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण 18,85,600 मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या 12,01,941 होती. या जागेवरून शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र धेड्या गावित विजयी होऊन खासदार झाले होते. त्यांना एकूण 5,80,479 मते मिळाली होती. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम सुकूर जाधव एकूण 4,91,596 मतांसह दुसऱ्या स्थानावर होते. त्यांचा 88,883 मतांनी पराभव झाला होता. त्या तिघांच्या तुलनेत इतर उमेदवारांचा मतांचा टक्का 1 टक्के इतका आहे.
याच 2019 च्या आकडेवारीचा दाखल देत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी हा विजयाचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याला त्यांच्या बोईसर, नालासोपारा आणि वसई या विधानसभा मतदारसंघांतील विजयाचा आधार आहे. 2019 मध्ये नालासोपारा मतदारसंघातून बविआचे क्षितिज ठाकूर आमदार झाले. त्यांना 1,49,868 इतकी मते होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राहिलेल्या शिवसेनेच्या प्रदीप शर्मा यांना तब्बल 1,06,139 इतकी मते होती. या निवडणुकीत वसईतून बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर उमेदवार होते. त्या वेळी त्यांना 1,02,950 इतकी मते होती. तर शिवसेनेच्या विजय गोविंद पाटील यांना 76,955 मते होती. बोईसर मतदारसंघात बविआच्या राजेश पाटील यांना 78,703; तर शिवसेनेच्या विलास तरे यांना 75,951 इतकी मते होती. त्या वेळी अपक्ष; पण भाजपच्याच संतोष जनाठे यांनी विलास तरे यांच्या वाट्याची तब्बल 30,952 मते घेऊन राजेश पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला होता. हा अपवाद वसई आणि नालासोपाऱ्यातही नव्हता.
त्या वेळी शिवसेना-भाजप अशी युती होती. परंतु राजकीय वाटाघाटींत (प्रचारातून अंग काढून) भाजपने आपल्या खात्यातील मते अप्रत्यक्ष बहुजन विकास आघाडीच्या झोळीत टाकली होती. त्यामुळे आमदार हितेंद्र ठाकूर व क्षितिज ठाकूर यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. शिवसेना-भाजप यांच्यातील राजकीय कुरघोडीत नंतर हे पितळ उघडे पडले होते.
बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार घोषणेमुळे महाविकास आघाडी, महायुती व बविआ अशी तिरंगी लढत या वेळी होणार आहे. वरील आकडेवारी लक्षात घेतल्यास बहुजन विकास आघाडीच्या बोईसर, नालासोपारा व वसईतील वैयक्तिक मतांचा अंदाज यावा. त्यांच्या मताधिक्क्याची एकत्रित आकडेवारी 3,31,339 इतकी आहे. तर 2018 पोटनिवडणुकीत बळीराजम जाधव यांच्या मतांची संख्या 2,22,838 इतकी आहे. वाढीव 1,08,501 ही मते कुणाच्या झोळीत जातील, हे सांगता येणार नाही. कारण नालासोपारा विधानसभा मतदारसंघात बहुतांश मतदार उत्तर भारतीय आणि गुजराती आहेत. विधानसभेत ते बविआसोबत असले तरी लोकसभेसाठीचा त्यांचा कल भाजपकडे असतो. वसईत मुस्लिम व ख्रिस्ती समाजाचे मताधिक्क्य आहे. त्यातील अधिक तर महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बोईसर मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्राबल्य आहे. उर्वरित डहाणू मतदारसंघात सीपीएम, विक्रमगडमध्ये राष्ट्रवादी; तर पालघरमध्ये पुन्हा शिवसेना यांचे प्राबल्य आहे. सीपीएम या पक्षाकडे स्वत:ची अशी एकगठ्ठा 72 हजार इतकी मते आहेत. ही मते महाविकास आघाडीच्या पारड्यात जाणार आहेत. त्यामुळेच आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी घोडामैदान दूर आहे. खरे तर याची जाणीव त्यांनाही असेल. पण महायुतीच्या पाठिंब्याच्या प्रतीक्षेत ते गाजराची पुंगी वाजवत आहेत. ही पुंगी वाजली तर वाजली नाही; तर मोडून खाल्ली! अशी ‘चाणक्यनीती` त्यांची आणि त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची असावी. पण या सगळ्याचे प्रतिबिंब येणाऱ्या विधानसभा निवडणुकांत उमटणार आहे. किमान त्या निवडणुकीत विजयाची पताका फडकवायची तर मागील चार वर्षांत दूर गेलेल्या कार्यकर्त्यांना जवळ करण्यापासून आमदार हितेंद्र ठाकूर यांना पर्याय नाही. किमान या लोकसभा निवडणुकीनिमित्ताने त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम तरी द्यावा!