भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजात समतेची भावना अधिक बळकट करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी मंत्रालय, मुंबई येथे वित्त विभागाच्या नोंदणी शाखेत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यालयाला सुट्टी असल्याने त्याच्या पूर्वसंध्येलाच हा अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी पाटील म्हणाले, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच देशात लोकशाही, समता आणि न्यायाची भक्कम पायाभरणी झाली आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजात समतेची भावना अधिक बळकट करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
या प्रसंगी वित्त विभागाच्या नोंदणी शाखेतील मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.