दिग्गज्यांच्या उपस्थितीत आमदार भरतशेठ गोगावले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
महाडमध्ये भव्य शक्तिप्रदर्शन
महाड : महाड विधानसभेमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या गोगावले व जगताप कुटुंबियांमध्ये पून्हा लढत होत असून यंदा स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप कामत या आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काल २८ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे मा. उद्योग मंत्री सुभाष देसाई, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार स्नेहल जगताप कामत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
महायुतीचे महाड विधानसभेचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले यांचा आज २९ ऑक्टोबर २०२४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, रायगड लोकसभेचे खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रविण दरेकर, माजी आमदार अनिकेत तटकरे या दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
या सभेत संबोधित करताना आमदार भरतशेठ गोगावले यांनी केलेल्या विकासकामांचा गवगवा करीत चोवीस जनतेसाठी झटणाऱ्या आमदाराला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन आमदार प्रविण दरेकर यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. ‘आपला भरत, येईल परत’ असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेचा खरपूस समाचार घेत मा. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केलेल्या टीकेला प्रतिउत्तर दिले. ‘तुम्ही उद्योग मंत्री असताना तुमच्या मुलाने काय काय उद्योग केले हे सांगण्याची वेळ आमच्यावर आणू नका’ असा सूचक इशारा देखील या सभेतून उदय सामंत यांनी सुभाष देसाई यांना दिला. आमदार भरतशेठ गोगावले हे केवळ विजयाचा चौकार मारणार नाहीत तर एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. आमदार भरत शेठ गोगावले हे त्यांची इच्छा असेपर्यंत महाड विधानसभेचे आमदार राहतील असे भाकीत देखील यावेळी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्यात महायुतीची सत्ता येताच पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारातच आमदार गोगावलेंना मंत्रिपद व रायगडचे पालकमंत्री पद दिले जाईल असा विश्वास व्यक्त केला.
आमदार भरतशेठ गोगावले यांनी गोर गरीब निष्ठावंत शिवसैनिकांना संबोधित करताना ‘आपण मागील पंधरा वर्षात केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली. जनतेच्या सुखा दुखात, जनतेच्या अडचणीच्या काळात आम्ही वर्षाचे ३६५ दिवस सर्वांसाठी उपलब्ध असतो त्यामुळे जनता आम्हाला आशीर्वाद देत असते. जमलेला जनसमुदाय हा ग्रामीण भागातील असून कोणी पैसे देऊन आणलेला नाही.महाड विधानसभेतील गोर गरीब जनता हिच माझ्या विजयाचे शिल्पकार ठरणार, असा आत्मविश्वास व्यक्त केला. मुस्लिम, बौद्ध, आदिवासी यापैकी कोणीही असेल तरीही तुमच्या ह्या आमदाराने दुजाभाव केला नाही. महाराष्ट्रातला असा एकमेव मी आमदार आहे ज्याच्या चुलीपर्यंत जाण्याचा अधिकार सर्व सामान्य कार्यकर्त्याला असल्याची आठवण करून दिली. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांनी स्वतःचा आत्मपरीक्षण करावं, आपण किती पक्ष बदलले मग खरे गद्दार कोण असा टोला देखील यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप यांना लगावला.