भाजपला दे धक्का: परभणीत ६ नगरसेवक राष्ट्रवादीत तर यवतमाळचा माजी आमदार फोडला

मुंबई: राष्ट्रवादीत सध्या जोरदार इनकमिंग सुरु आहे. आज परभणीच्या सोनपेठ नगरपरिषदेचे गटनेते चंद्रकांत राठोड यांच्यासह 6 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधलं. तर तिकडे यवतमाळच्या अर्वी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पक्षाचे नेते राजेश विटेकर यांच्या पुढाकाराने आज बंजारा समाजाचे नेते आणि सोनपेठ नगरपरिषदेचे गटनेते चंद्रकांत राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज जाहीर प्रवेश केला.

दरम्यान, चंद्रकांत राठोड यांच्यासमवेत सोनपेठ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. जिजाबाई चंद्रकांत राठोड, नगरसेविका योजना दिगांबर पाटील, माजी उपनगराध्यक्ष दिगांबर भाडुळे पाटील, नगरसेविका नलिनी विनोद चिमनगुंडे, सौ. चंद्रकला भिमराव तिरमले, कुरेशी जुलेखाबी जिलाणी, राज सैदाबी जहीर, शेख मेराजबी इनुस, सदस्य रमाकांत राठोड, निलेश चंद्रकांत राठोड यांनी देखील पक्षात प्रवेश केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेदरम्यान राजेश विटेकर यांनी परभणीत पक्षाची ताकद अधिक वाढणार आहे असे सांगितले होते. आज तो दिवस आला आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.