पुरुषोत्तम मासानिमित्त पुण्याच्या उमामहेश्वर मंदिरात विष्णूसहस्रनाम याग; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले दर्शन
पुणे : पुरुषोत्तम मासातील ज्येष्ठ कृष्ण चतुर्थीचे अत्यंत पवित्र औचित्य साधून पुण्याच्या नातू बागेतील प्रसिद्ध उमामहेश्वर मंदिरात विशेष ‘विष्णूसहस्रनाम याग’ आयोजित करण्यात आला होता. या धार्मिक सोहळ्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून विष्णूसहस्रनाम यागात सहभाग घेतला. यावेळी आमदार हेमंत रासने देखील उपस्थित होते.
या मंगलप्रसंगी पाटील यांनी भगवान श्रीविष्णूंची विधीवत आणि मनोभावे पूजा-अर्चा केली. तसेच राज्यातील संपूर्ण जनमानसाच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.

या धार्मिक विधीबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “पुरुषोत्तम मासात केली जाणारी नामसाधना, नामस्मरण आणि यज्ञ-याग हे मानवी मनाला आध्यात्मिक बळ देणारे असतात. ही पवित्र नामसाधना सर्वांच्या जीवनात सुख-शांती, समृद्धी आणि मंगलमयता घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना आहे.
या सोहळ्याला मंदिराचे विश्वस्त, स्थानिक नागरिक आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण मंदिर परिसर विष्णूसहस्रनामाच्या जयघोषाने आणि मंत्रोच्चाराने भक्तीमय झाला होता.