कोथरूडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वतीने गरजू कुटुंबांसाठी अल्पदरात दिवाळी फराळ उपक्रम; सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम

15

पुणे, ०३ नोव्हेंबर : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सोहळा. या सणाचा गोडवा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोथरूड मतदारसंघात अल्पदरात दिवाळी फराळ उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे .

सणासुदीच्या काळात आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गरजू कुटुंबांना बाजारातील महागडा फराळ खरेदी करणे शक्य होत नाही . हीच बाब लक्षात घेऊन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. चकली, चिवडा, लाडू, करंजी अशा दिवाळीच्या पारंपरिक आणि दर्जेदार पदार्थांचा आस्वाद प्रत्येक कुटुंबाला घेता यावा आणि प्रत्येक घरातील दिवाळी आनंदाने साजरी व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “दिवाळीचा खरा आनंद केवळ स्वतःच्या घरापुरता मर्यादित नसतो, तर आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्यात असतो . समाजातील प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा दिवा उजळावा, याच भावनेतून अशा उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे .

या उपक्रमामुळे कोथरूड मतदारसंघातील हजारो सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, नागरिकांमधून या उपक्रमाचे भरभरून कौतुक होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.