पुण्यात लोकशाही रक्षणासाठी ‘मी भारत प्रेमी’चा भव्य मोर्चा; ५ हजारांहून अधिक पुणेकरांसह मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सहभाग

15

पुणे : पुणे शहरात लोकशाहीच्या रक्षणार्थ आणि समाजकंटकांच्या अराजकतेविरोधात ‘माझा देश, माझी जबाबदारी’ या उदात्त भावनेतून ‘मी भारत प्रेमी’ संघटनेच्या वतीने एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या जनमोर्चामध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सुजाण पुणेकरांसोबत सहभाग नोंदवला.

हा मोर्चा पुण्यातील ऐतिहासिक छत्रपती संभाजी महाराज उद्यान ते डेक्कन जिमखाना दरम्यान काढण्यात आला होता. यामध्ये ५ हजारांहून अधिक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आणि विशेषतः महिला भगिनींनी मोठ्या संख्येने व उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मोर्चामध्ये नागरिकांच्या हाती देशप्रेम आणि लोकशाही मूल्यांचा संदेश देणारे फलक होते.

या प्रसंगी संवाद साधताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आपले मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, अलीकडच्या काळात बिनबुडाचे आरोप करून सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्ती वाढल्या आहेत. अशा अराजक प्रवृत्तींना रोखणे, राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे हाच या मोर्चाचा मुख्य उद्देश आहे.

राष्ट्रहित सर्वोपरि मानून समाजात शांतता, सुव्यवस्था आणि एकात्मता टिकवून ठेवणे ही देशातील प्रत्येक नागरिकाची आद्य कर्तव्य आणि जबाबदारी आहे, असे मंत्री पाटील यांनी नमूद केले. लोकशाहीवरील जनतेचा विश्वास दृढ करणारा हा भव्य जनसमुदाय देशाच्या प्रगतीला आणि अखंडतेला निश्चितच एक नवी दिशा देईल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.