साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महात्मा जोतिराव फुले चरित्र-साधने प्रकाशन समितीची आढावा बैठक संपन्न; १ ऑगस्ट २०२६ रोजी १० नव्या ग्रंथांचे होणार प्रकाशन

8

मुंबई : महापुरुषांचा वैचारिक वारसा आणि त्यांचे अमूल्य साहित्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. मुंबई येथे ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ आणि ‘महात्मा जोतिराव फुले चरित्र-साधने प्रकाशन समिती’ची महत्त्वपूर्ण आढावा बैठक राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत दोन्ही महापुरुषांच्या साहित्याचे उत्कृष्ट दर्जाने प्रकाशन, पुनर्मुद्रण आणि इतर भाषांमध्ये भाषांतर करण्यासोबतच, नवीन साहित्यनिर्मिती या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत संशोधक आणि वाचकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार, पूर्वी प्रकाशित झालेल्या ७ महत्त्वाच्या खंडांचे पुनर्मुद्रण करून त्यांचे नव्याने प्रकाशन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. हा निर्णय महापुरुषांच्या मूळ विचारांचे जतन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

तसेच, येत्या १ ऑगस्ट २०२६ रोजी असणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या अजरामर कथा आणि कादंबऱ्यांवर आधारित स्वतंत्र स्वरूपातील १० नव्या ग्रंथांचे प्रकाशन करण्यास या बैठकीत अधिकृत मान्यता देण्यात आली. महापुरुषांचे हे विचारधन जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि नवीन पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे, या दृष्टीने उच्च व तंत्र शिक्षण विभाग वेगाने काम करत आहे.

या बैठकीस उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि दोन्ही समित्यांचे सदस्य उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.