राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी देशातील २१ गुरुजनांची निवड; आयआयटी मुंबईच्या डॉ. विक्रम विशाल यांच्यासह महाराष्ट्रातील तिघांचा समावेश, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून गौरव

11

मुंबई : “ज्ञान देणारा शिक्षक केवळ विद्यार्थी घडवत नाही, तर तो खऱ्या अर्थाने राष्ट्राच्या भवितव्याची भक्कम पायाभरणी करत असतो,” अशा शब्दांत शिक्षकांच्या महान कार्याचा गौरव करत, उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील २१ गुरुजनांची या वर्षीच्या ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी’ (National Teachers’ Award) निवड झाली असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राचा डंका वाजला असून, राज्यातील ३ उत्कृष्ट शिक्षकांचा यात समावेश आहे.

या राष्ट्रीय पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून डॉ. विक्रम विशाल (भारतीय तंत्रज्ञान संस्था – आयआयटी, मुंबई), डॉ. संदीपान नरोटे (शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर) आणि डॉ. अमर ताकसांडे (जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज – जेएनएमसी, वर्धा) यांची निवड झाली आहे. ही निवड संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंद आणि अभिमानाची बाब असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून, आगामी ५ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते या सर्व मान्यवर शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने अधिकृतपणे सन्मानित केले जाणार आहे.महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव देशाच्या नकाशावर उंचावणाऱ्या या तिन्ही सन्माननीय गुरुजनांचे, तसेच देशभरातून या पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या सर्व २१ शिक्षकांचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच, त्यांच्या पुढील ज्ञानसाधनेला आणि राष्ट्रनिर्मितीच्या या पवित्र कार्याला आगामी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.