शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त राष्ट्रीय कबड्डीपटू तारक राऊळ यांचे निधन… महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राची मोठी हानी – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : भारतीय कबड्डी क्षेत्रातील दिग्गज खेळाडू आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारविजेते तारक राऊळ यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा वर्तुळात, विशेषतः कबड्डी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.
भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत त्यांनी आपल्या अष्टपैलू क्रीडाकौशल्याने राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कबड्डीची अमिट छाप उमटवली होती. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आणि अनेक नवोदित खेळाडूंना घडविण्यात मोलाचे योगदान दिले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तारक राऊळ यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. तारक राऊळ यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांनी आपल्या क्रीडाकौशल्याने कबड्डी क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.