भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या शुभेच्छा
मुंबई : देशाच्या सुरक्षेसाठी आयुष्य समर्पित करत असामान्य धैर्य, दूरदृष्टी आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, लोकमान्य टिळकांच्या विचारांचा वारसा जपत राष्ट्रसेवेला सर्वोच्च मान देणाऱ्या या पुरस्काराने डोवालजी यांच्या अतुलनीय योगदानाचा योग्य गौरव केला आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी केलेले कार्य प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे.
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीदिनी, १ ऑगस्ट रोजी पुण्यात केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रहितासाठी त्यांची अविरत सेवा आणि प्रेरणादायी कार्य असेच अखंड सुरू राहो, हीच सदिच्छा.
देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी अजित डोवाल यांनी अहोरात्र घेतलेले परिश्रम आणि धोरणात्मक दूरदृष्टी. दहशतवादविरोधी कारवाया, गुप्त मोहिमा आणि ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर-२’, ‘ऑपरेशन सिंदूर’, ‘बालाकोट एअर स्ट्राईक’ तसेच ‘डोकलाम’ राजनैतिक वाटाघाटींमधील त्यांची निर्णायक भूमिका घेतली. गुप्तचर विभागात (IB) ३३ वर्षांहून अधिक काळ बजावलेली उत्कृष्ट सेवा आणि भारताचे सर्वाधिक काळ कार्यरत असणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांची कारकीर्द महत्वपूर्ण आहे.
लोकमान्य टिळकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ १९८३ पासून राष्ट्रीय प्रगतीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिग्गजांना हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्योगपती राहुल बजाज, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राष्ट्रभक्तांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित यादीत आता भारताचे ‘जेम्स बॉन्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित डोवाल यांच्या नावाचा समावेश झाला आहे.