“या कठीण काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे” ; सांगलीच्या बांधावरून मंत्री चंद्रकांत पाटलांचा शेतकऱ्यांना दिलासा
सांगली : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (१५ ऑक्टोबर) सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून प्रत्यक्ष बांधावर जात शेतकरी बांधवांशी संवाद साधला. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा आढावा घेत, “या कठीण काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुष्काळी मदतीची संपूर्ण प्रशासकीय कार्यप्रणाली आणि पंचनामे पूर्ण होण्याची वाट न पाहता, आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रति शेतकरी ५,००० रुपये अग्रीम (Advance) रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या तातडीच्या थेट मदत निर्णयाची माहिती सांगलीतील शेतकरी बांधवांना दिली.
३४ जिल्ह्यांतील २६५ तालुक्यांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
दुष्काळाची झळ सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आणखी एका महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क (Exam Fee) पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. या सवलतीमध्ये अभियांत्रिकी (Engineering), कला (Arts) तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक महाविद्यालयांचा समावेश आहे.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर
दौऱ्यादरम्यान मंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, पिकांचे झालेले नुकसान आणि चाऱ्याची उपलब्धता याविषयी सविस्तर माहिती घेतली. प्रशासकीय पातळीवर दुष्काळी उपाययोजना अधिक गतीने राबवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. “शेतकऱ्यांचे कुटुंब आर्थिक संकटात असताना त्यांचे सण आणि मुलांचे शिक्षण थांबणार नाही, याची काळजी राज्य सरकार घेत आहे,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष महेश खराडे, सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जिल्हा सरचिटणीस अनिल लोंढे, जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे गटनेते आशिष जाधव, कवठेमहांकाळ मंडलाचे मंडलाध्यक्ष उदयराजे भोसले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.