पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक: कोल्हापुरात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा झंझावाती गृहसंपर्क; मतदारांशी साधला थेट संवाद

12

कोल्हापूर, १७ ऑक्टोबर : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, महायुतीने आपली संपूर्ण ताकद मैदानात उतरवली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूर शहरात स्वतः घरोघरी जाऊन (Door-to-Door Campaign) मतदारांशी थेट संवाद साधला आणि महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी मतदारांना आवाहन केले.

घरोघरी जाऊन मतदारांच्या घेतल्या वैयक्तिक भेटी

या जनसंपर्क मोहिमेदरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारांच्या वैयक्तिक भेटी घेतल्या. सुशिक्षित आणि बुद्धिवंतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या निवडणुकीचे महत्त्व त्यांनी मतदारांना पटवून दिले. तसेच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी त्यांनी मतदारांना मतदान प्रक्रियेची सविस्तर माहिती देत, मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडून हक्क बजावण्याचे आवाहन केले.

महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन

प्रचाराच्या या अंतिम टप्प्यात बोलताना मंत्री पाटील यांनी, भाजप-महायुतीच्या पदवीधर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. महायु सरकारने शिक्षण आणि पदवीधरांसाठी घेतलेले निर्णय तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचवत, दोन्ही उमेदवारांना ऐतिहासिक मताधिक्याने विजयी करण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रचार मोहिमेत भाजपाचे कोल्हापूर शहराध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे आणि आप्पा लाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.