गोव्यात भाजप पुन्हा बहुमताने सरकार स्थापन करणार; फडणवीसांचा दावा
पणजी: पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रभारीपदाची जबाबदारी भाजपनं देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. ही जबाबदारी दिल्याबद्दल फडणवीस यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहेत. ‘गोव्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार बहुमताने स्थापन करणार असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
फडणवीस म्हणाले, काँग्रेससमोर पक्षाचे अस्तित्त्व टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. पक्ष नेतृत्वाचा मोठा प्रश्न आहे. आम आदमी पक्ष केवळ पोस्टरबाजी करण्यात व्यग्र आहे. राज्य चालवण्यासाठी आचार, विचार आणि नीती लागते. अराजकतेनं अस्तित्व दाखवता येते पण राज्य चालवू शकत नाही, असा खरमरीत टोला फडणवीस यांनी काँग्रेसला आणि आम आदमी पक्षाला लगावला. तसेच २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप पूर्ण आणि अश्वासक बहुमताने गोव्यात सरकार बनवेल, असा दावाही फडणवीस यांनी यावेळी केला.
मजबूत सरकार आणि मजबुत संघटन घेऊन भाजप या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असून, ऐतिहासिक विजय मिळवू. देशाला योग्य दिशेने पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात होऊ शकते, याची जाणीव जनतेला झाली आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
गोवा सरकारने लसीकरणात मोठी आघाडी घेतली. १०० टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात अनेक दुर्बल घटकांना विविध प्रकारची मदत करण्याचे काम गोवा सरकारने केले. पूरग्रस्तांनाही मोठी मदत, रोजगाराच्या क्षेत्रातही मोठं काम झालं आहे. सरकार आपल्या दारी हा उपक्रमही तितकाच महत्वाचा आहे. जनतेचे प्रश्न तात्काळ आणि त्याच ठिकाणी निकाली काढण्यासाठी त्याची मोठी मदत होणार असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.