डोंबिवलीतील घटनेनंतर; फडणवीसांचा सरकारला महत्त्वाचा सल्ला

नागपूर: साकीनाका बलात्कार प्रकरणात पीडित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आता डोंबिवली येथे एका अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून राज्य सरकारला जाब विचारण्यात येतोय. याच घटनेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत चिंता व्यक्त केली. डोंबिवलीची घटना ही अतिशय धक्कादायक आहे. सातत्याने वाढत्या घटना या चिंताजनक आहेत. तसेच असे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष प्रयत्न करणे गरचेचे असल्याचे मत व्यक्त केले.
राज्यात सध्या भयाचे वातावरण आहे, असे म्हणत सरकारने, गृहमंत्रालयाने आणि पोलिसांनी यामध्ये विशेष लक्ष घालण्याची गरज आहे. डोंबिवलीसारखा भाग जो साधारणपणे शांत भाग समजला जातो, अशा ठिकाणी बलात्कारासारखी घटना घडणं हे अतिशय धक्कादायक असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
डोंबिवलीत 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये काही राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे.
प्रियकराने जानेवारी महिन्यात पीडित मुलिवर बलात्कार करत व्हिडियो काढला होता. या व्हिडिओच्या आधारे पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर 29 जणांनी बलात्कार केल्याची माहिती सध्या समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु केला असून आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
जानेवारी महिन्यात पीडित तरुणीवर तिच्या प्रियकराने बलात्कार करत तिचा व्हिडियो काढला होता. हा व्हिडियो या तरुणाने आपल्या मित्रांना दाखवला. या व्हिडियोच्या आधारे आतापर्यंत 29 जणांनी या पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. बदलापूर, रबाळे, मुरबाड आणि डोंबिवलीत वेगवेगल्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला गेला. मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामध्ये दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. 21 आरोपींच्या अटकेनंतर पोलीस सहा आरोपींच्या शोधात आहेत.