राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस नेते फडवीसांच्या भेटीला; राष्ट्रवादी-शिवसेना नाराज

मुंबई: महाराष्ट्रात होणाऱ्या राज्यसभेच्या पोट निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार रजनी पटेल यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात या दोघांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतले इतर दोन पक्ष नाराज झाल्याची चर्चा रंगली आहे. तसंच आघाडीत बिघाडी होण्यासाठी हा नवा विषय ठरणार का? याचीही चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. यासाठी काँग्रेसने रजनी पाटील तर भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. मात्र एखाद्याच्या निधनानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी ही परंपरा आहे अशी काँग्रेसची भावना आहे. त्यामुळेच त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
काँग्रेसला महाविकास आघाडीवर विश्वास उरला नाही का…? ज्यामुळे अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन विनंती करावी लागते आहे? असा प्रश्न सत्तेतले इतर दोन पक्ष विचारत आहेत असं कळतंय. सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यसभा पोट निवडणूक बिनविरोध करायची असेल तर त्या बदल्यात भाजपच्या निलंबीत 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्याची मागणी केलीय.
राष्ट्रवादी-शिवसेना नाराज?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करायची असेल तर त्या बदल्यात भाजपचे निलंबित 12 आमदारांवरील कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे. या साठमारीच्या राजकारणामुळे आणि काँग्रेस नेत्यांच्या आजच्या लोटांगण प्रयत्नामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.