“बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच ‘चंदा’!”, आशिष शेलारांचा घणाघात

मुंबई: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना मोटारीखाली चिरडून मारल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यावरुन “बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच ‘चंदा’,” असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी  ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

“बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित”बंदसम्राटांचा” पुन्हा आज इतिहास आठवा… मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केले, युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी,श्रमिकांना देशोधडीला लावले”

“एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलेय.. कोस्टल रोडला विरोध…नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध.. मेट्रोचेही हे विरोधकच.. हे तर विकासातील गतीरोधक! बंद आणि विरोध यांचा “धंदा” गोळा होतो त्यावरच “चंदा”! आई जगदंबेच्या नवरात्रीत महाराष्ट्र बंद, ही तर तिघाडीतील तीन पक्षांची “महिषासुरी”चाल, आई दुर्गामाते जनतेला दे “बळ”! उधळून टाकील जनता या महिषासुरांचा हा “खेळ”!, अशा शब्दात आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलंय.