चौकशीसाठी आले ही चूक नाही, पण त्यांना थांबायला सांगितलं जात होतं – शरद पवार

पिंपरी: ईडी, सीबीआय आणि एनसीबी या केंद्रीय यंत्रणांच्या वाढलेल्या कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर गंभीर आरोप केले. आयकर विभागाने अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी करण्यात आलेल्या धाडसत्रांवर पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी संवाद साधला बोलताना पवारांनी पहिल्यांदा सविस्तरपणे भाष्य केलं.

पवार म्हणाले की, ‘अजित पवार यांच्या तीन बहिणींविरुद्ध आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यांचं काम दोन-तीन दिवसात पूर्ण झालं. त्यानंतरही आयकर विभागाचे अधिकारी लोक जायला तयार नव्हते. पाच दिवस ते लोक ठाण मांडून होते. मला असं वाटतं की, चौकशीसाठी आले ही चूक नाही. त्यांना वरून आदेश दिले गेले. ते लोक चौकशी पूर्ण झाली आहे, असं सांगत होते पण त्यांना थांबायला सांगितलं जात होतं. यातून यंत्रणांचा गैरवापर दिसून येतो’,

तसेच कोळसा टंचाईवरही पवारांनी भाष्य केलं. ‘3000 हजार कोटी महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकारला देणे आहे. यातील 1400 कोटी देण्याची व्यवस्था कालच महाराष्ट्र सरकारने केली आहे. आता याउलट जवळपास 35000 कोटी GST चे पैसे महाराष्ट्राला केंद्राकडून येणे आहे, त्याचं काय?’, असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला.