निष्ठावंत म्हणून प्रसिद्धीचा स्टंट करणाऱ्यांनी आपली निष्ठा तपासावी – अमोल थोरात
पिंपरी: भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप पिंपरी-चिंचवड महापालिकेत हस्तक्षेप करत आहेत. मनमानी व हुकूमशाही पद्धतीने कारभार करतात. त्यांनी अनेक नगरसेवकांना त्रस्त करत असल्याचा आरोप करत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी पत्रादूवारे तक्रार केली आहे. यावर आता भाजपा मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी नाव न घेता प्रतिउत्तर दिले आहे.
अमोल थोरात म्हणाले की, भारतीय जनता पार्टी हा शिस्तप्रिय पक्ष आहे. पक्षविरोधी कारवायांना थारा दिला जाणार नाही. पदांचा लाभ मिळवण्यासाठी पक्षाची बदनामी सहन केली जाणार नाही. प्रसंगी हेकेखोरांची हकालपट्टी करण्यात येईल, असा इशारा भाजपा मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिला आहे.
भाजपामधील महत्त्वाच्या पदांचा लाभ न मिळाल्यामुळे अस्वस्थ झालेले काहीजण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचा दावा करीत आहेत. पक्षशिस्त महत्त्वाची आहे. सर्वांनी पक्ष आणि संघटन वाढवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पक्षांतर्गत बाबी चव्हाट्यावर मांडून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. निष्ठावंत म्हणून प्रसिद्धीचा स्टंट करणाऱ्यांनी आपली निष्ठा तपासावी. निष्ठावंत भाजपाची कधीच बदनामी करणार नाहीत, असा असेही थोरात म्हणाले.
तुषार कामठे याचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
भाजपाच्या आमदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे खापर विरोधी पक्ष व जनता महापालिकेतील आपल्या नगरसेवकांवर फोडणार हे निश्चित आहे. लांडगे व जगताप यांनी शहरात मनमानी व हुकूमशाही पद्धतीने महापालिकेत हस्तक्षेप करत अनेक नगरसेवकांना त्रस्त केले आहे. त्यामुळे आपल्याच पक्षातील काही नगसेवक यांच्या कारभारावर नाराज आहेत. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुक तिकीटवाटपाच्या संदर्भात लांडगे गट किंवा जगताप गटाचा समर्थक, नातेवाईक किंवा स्नेही म्हणून निर्णय न घेता भाजपाच्या मेहनती सर्वसामान्य सच्च्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी
राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांकडून मी भाजपच्या आमदारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजप पक्ष सोडणार असल्याची चर्चा सध्या शहरात चालू आहे. पण मी भाजपच्या कोणत्याही आमदाराच्या गटातील म्हणून नव्हे, तर भाजपाचा एक सच्चा शिलेदार म्हणून काम करतो आहे. ज्या दोन आमदारांनी चुकीची कामे केली आहेत ते कदाचित स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पक्षाचा त्याग करू शकतात. पण मी भाजपाच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजकारण करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कायम पक्षाशी एकनिष्ठ राहणार असून पक्षाचे होणारे नुकसान पाहू शकत नाही.