मनसेचा मुंबई, पुण्यातील मेळावा अचानक रद्द; राज ठाकरे आजारी असल्यानं निर्णय

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखाध्यक्षांचे मेळावे अचानक रद्द करण्यात आले आहेत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे संबोधित करणार असल्याने या मेळाव्यांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. काही अपरिहार्य कारणामुळे मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचे मनसे सचिव सचिन मोरे यांनी पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून जाहीर केले आहे.

मुंबईतील भांडुप येथे शनिवारी, तर रविवारी पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे शाखाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजारी असल्याने हा मेळावा रद्द करण्यात आल्याचे समजते. पुढील मेळाव्याची तारीख, वेळ व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असं मनसेच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मात्र, मेळावा रद्द करण्याचं कारण देण्यात आलेलं नाही. मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली असतानाच ऐनवेळी मेळावा रद्द करण्यात आल्याने मनसे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

आज भांडूप येथे हा मेळावा होणार होता. या मेळावाच्या आयोजनाबाबत आज मनसे मुख्यालय राजगड येथे बैठक फार पडली होती. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली होती. या मेळाव्यातून राज ठाकरे मुंबईत मुंबई महापालिका आणि पुण्यात पुणे महापालिकेचं रणशिंग फुंकणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे मनसेच्या या मेळाव्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.

Read Also :