हायड्रोजन सोडा, मलिकांना आता ऑक्सिजनची गरज पडेल; आशिष शेलार यांची खोचक टीका

मुंबई: हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे सकाळी लवंगीसुद्धा लावू शकले नाहीत. त्यांनी लवंगी लावण्याचा प्रयत्न केला त्यातही हात पोळले. नवाब मलिक यांची हतबलता आणि घालमेल इतकी होती की हायड्रोजन सोडा त्यांना ऑक्सिजनची गरज लागेल की काय अशी अवस्था झाली आहे, अशा शब्दात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर टीका केली.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर आरोपांची सरबत्ती केली. मलिक यांच्या या आरोपानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला प्रत्युत्तर दिलं. हाजी हैदर, हाजी अराफतचा भाऊ, रियाझ भाटी, समीर वानखेडे, वसुली, आंतरराष्ट्रीय फोन अशी नावं आणि असे शब्द आणून त्यांनी खूप मोठं चित्रं निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. या सर्व प्रकरणाशी फडणवीसांशी संबंध जोडणं म्हणजे बिरबलाने जमिनीवर कोळसा ठेवून ऊंचावर ठेवलेली बिर्याणी शिजवण्यासारखा आहे.
रियाझ भाटी गायब असल्याचं सांगितलं जातं. तो गायब आहे की त्याला पळवलं गेलं. रियाझ भाटीला पळवून नेण्याचं काम तर राष्ट्रवादीने केलं नाही ना हा आमचा आरोप आहे. वाझेच्या वसुली गँगमध्ये जी नावे समोर आली. त्यात रियाझचं नावही आलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. रियाझ कोठडीत आला तर सत्यबाहेर येईल. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांना पळवून लावले नाही ना अशी शंका येत आहे, असा गंभीर आरोप शेलार यांनी केला.
नवाब मलिक यांची आम्हाला चिंता वाटत आहे. दिवसागणिक त्यांचं मानसिक संतुलन बिघडतंय की काय ही आशंका आमच्या मनात आहे. कदाचित हर्बल तंबाखूचा सप्लाय बंद पडला असेल. मलिकजी स्वत:ला शांत करा. राजकारण आपल्या जागी आहे. जावयाच्या प्रेमापोटी आणि स्वत:चं म्हणणं खरं करण्यासाठी राजकारणाच्या नीच पातळीवर जाऊ नका. राजकारणाच्या नीच पातळीचं वर्णन करायचं झालं तर त्याला नवाबी पातळी म्हणता येईल. या नवाबी पातळीपर्यंत आपण जाऊ नये ही आमची इच्छा आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.