देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट चालवले जायचे – नवाब मलिक
मुंबई: देशभरात 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीवार्दाने बनावट नोटांचे रॅकेट सुरु होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी देशातील काळा पैसा आणि बनावट नोटांचा साठा नष्ट करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर देशभरात विविध ठिकाणी बनावट नोटा सापडत होत्या. मात्र, महाराष्ट्रात संपूर्ण वर्षभर एकदाही बनावट नोटा सापडल्या नाहीत. कारण, या सगळ्या रॅकेटला देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद होता, असे नवाब मलिक यांनी म्हटले.
नवाब मलिक बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा गुन्हेगारी विश्वातील अनेक लोकांशी संबंध असल्याचा आरोप केला. नोटाबंदीच्या जवळपास एका वर्षानंतर 8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईच्या बीकेसी परिसरात 14 कोटी 56 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा पकडण्यात आला होता. मात्र, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले.
त्यावेळी केवळ 8 लाख 80 हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणातील लोकांना काही दिवसांतच जामीन मिळाले होते. तेव्हा हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे का सोपवण्यात आले नाही? या नोटा नक्की कुठून आल्या, याचा शोध का घेण्यात आला नाही, असे सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केले.