रेल्वेचा मोठा निर्णय! ‘स्पेशल ट्रेन’ होणार बंद; रेल्वे पुन्हा सामान्य वेळापत्रकानुसार धावणार

मुंबई: देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केला होता. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर नागरिकांच्या सेवेसाठी कोरोना स्पेशल एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यात आल्या होत्या. या स्पेशल रेल्वे गाड्या आता बंद करण्यात येणार असून, पूर्वीच्या एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. त्याबरोबर आधीचे रेल्वेभाडेही लागू करण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

तसेच कोरोना रुग्णांत घट झाल्यानंतर, सरकारने संपूर्ण देशभरात सामान्य रेल्वे सेवा पूर्णपणे पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे कोरोना येण्यापूर्वी देशात धावणाऱ्या 1700 एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्या पुन्हा धावू लागतील. यासाठी सरकारने CRISला सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करण्यास सांगितले आहे.

रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले की, ज्यांनी आगाऊ तिकीट बुक केले होते. त्यांच्याकडून कोणतेही अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही आणि कोणतेही पैसे परत केले जाणार नाहीत. म्हणजेच ज्यांनी आगाऊ तिकीट बुक केले आहे, त्यांच्याकडून भाड्याचा फरकही घेतला जाणार नाही किंवा त्यांना कोणताही परतावा दिला जाणार नाही. अशा प्रवाशांना त्यांच्या पूर्वीच्या तिकिटाच्या आधारेच रेल्वेमधून प्रवास करता येणार आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून एक्स्प्रेस गाड्या आणि भाडेदरात बदल करण्यात आले असले, तरी कोरोना प्रोटोकॉलचा नियम कायम असणार आहे. प्रवाशांना कोरोना नियमांचं पालन करावं लागणार आहे. 25 मार्च 2020 रोजी देशातील रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. 166 वर्षांत पहिल्यांदाच रेल्वे सेवेला ब्रेक लागला होता. मात्र, हळूहळू रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. यात सर्वात आधी मालगाड्या आणि श्रमिक रेल्वे एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या.