शिवसेना खासदार संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला; राजकीय चर्चेला उधान

मुंबई: शिवसेनेचे नेते संजय राऊत हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. राऊत हे पवारांना कोणत्या विषया संदर्भात भेटायला आले आहेत, याचं कारण गुलदस्त्यात आहे. मात्र, राऊत अचानक पवारांच्या भेटील आल्याने तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

संजय राऊत हे काही वेळापूर्वीच वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी राऊत चव्हाण सेंटरमध्ये आले आहेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत. या भेटीत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विलीनीकरणाच्या मुद्द्यावर काय भूमिका घ्यायची या बाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्या संदर्भातही पवार राऊतांकडून माहिती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ही बैठक किती वेळ चालेल याची काहीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेला एसटी कामगारांचा संप आजही सुरूच आहे. एसटी कामगार आझाद मैदानात जमलेले आहेत. जोपर्यंत एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत जागेवरून हटणार नसल्याचा निर्धार एसटी कामगारांनी व्यक्त केला आहे.  त्यामुळे तिढा अधिकच वाढला आहे. गेल्या 15 दिवसांपासून एसटीचा संप सुरू आहे. त्यामुळे सर्व एसटी डेपोत उभ्या आहेत. परिणामी एसटीला दिवसाला 15 ते 20 कोटींचा नुकसान होत आहे. शिवाय कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी प्रवाशांची संख्या घटली आहे. एकूण 35 टक्के प्रवाशी संख्या घटल्याने एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.