एसटी कर्मचाऱ्यांचे कामावर जाण्यातच त्यांचं हित, संपावर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांना राऊतांचा सल्ला

मुंबई: विलीनीकरणाचा विषय हा न्यायालयात आहेत. कामगरांनी कामावर जाण्यातच त्यांचं हित आहे. जे कोणी वकील आहेत. ते कामगारांना भडकावत आहेत. ते कामगारांना जगवायला येणार नाहीत. आम्ही गिरणी कामगारांची अवस्था पाहिली आहे. एसटी कर्मचारीही मराठी बांधव आहेत. त्यांनी शहाणपणाने आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार करावा आणि कामावर यावं, असं आवाहन शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्याना केलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याचा निर्णय महामंडळाने जाहीर केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संप स्थगित करण्याची घोषणा गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. मात्र, विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला. यामुळे संपाचा तिढा गुंतागुंतीचा बनला असून, महामंडळ संपकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत आहेत.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एसटी कामगारांना आपल्या कुटुंबाचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान एसटी कामगारांना आपल्या कुटुंबाचा शहाणाने विचार करावा, आणि जास्त ताणू नये, ताणल्यानंतर तुटते, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.