भाजपा कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याने खासदार संजय राऊत यांच्या विरोधात दिल्लीत गुन्हा दाखल

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात राजधानी दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याने राऊत यांच्याविरोधात भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत यांनी तक्रार दाखल केली होती. संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी दीप्ती रावत यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार  यांना खुर्ची देण्यावरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना “प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. ही XXगिरी बंद करा” असं राऊत म्हणाले होते.

शरद पवार यांना संजय राऊत खुर्ची देतानाचा एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवरून भाजपच्या काही नेत्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला होता. पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय? पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते, तरी मी त्यांना खुर्ची दिली असती, असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. XXगिरी बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.

“शरद पवारच काय, तिथे लालकृष्ण अडवाणी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती. पवारांचं वय, त्यांना होणारा त्रास या सर्व गोष्टी आहेत. आम्ही मांडी घालून बसतो. पवारांना वयोमानामुळे तसं बसता येत नाही. पायाचा त्रास आहे. अशावेळी पितृतुल्य व्यक्तीला खुर्ची दिली तर काय बिघडलं? हे जर कुणाला आवडलं नसेल तर ती विकृती आहे.

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादवही आले असते आणि त्यांना असा त्रास असता, तर त्यांनाही मी स्वत: खुर्ची दिली असती. राजकारणात मतभेद असतील, तरी हे सर्व लोक सार्वजनिक जीवनातील पितृतुल्य आहेत. ज्यांनी अडवाणींना आपल्यासमोर उभेही राहू दिले नाही, त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारू नये” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!