शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून तब्बल 12 तास चौकशी

1

जालना: राज्यातील सत्ताधारी पक्षातील लोकांच्या आणि नेत्यांच्या घरी आणि साखर कारखान्यांवर ईडी कडून छापेमारी करण्यात येत आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर केंद्रीय संस्थांकडून छापेमारी करण्यात आली होती. आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडी कडून 12 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. त्याआधी रामनगर साखर कारखाना खरेदीप्रकरणी जालना येथे ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. राज्यात औरंगाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत ईडीकडून छापेमारी सुरुच आहे.

रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीने काल छापेमारी केली. यावेळी ईडीकडून शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची सलग 12 तास चौकशी सुरू होती. रात्री 2 वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती. 2 वाजेनंतर ईडीचं पथक औरंगाबादकडे रवाना झाले आहे. दरम्यान, याआधी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.

काल दुपारी 2 वाजताच्या दरम्यान खोतकर यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले होते. त्यानंतर सलग 12 तास खोतकर यांची चौकशी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर जालना येतील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी ईडीकडे केली होती.

त्यानंतर काल ईडीच्या पथकाने जालना बाजार समिती कार्यालय, अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर यांचे कार्यालय आणि खोतकर यांचे निवासस्थान अशा तीन ठिकाणी छापेमारी केली. तसेच काही महत्वपूर्ण कागदपत्रे देखील ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.