मोठा दिलासा! देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती
मुंबई: जगभरात दहशत माजवणाऱ्या ओमिक्रॉन विषाणूने भारताची चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी संसर्ग थांबवण्यासाठी सर्व प्रशासन सज्ज झाली आहे. अशातच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ओमिक्रॉन विषाणूबाबत एक दिलासाजनक माहिती दिली आहे. देशात अद्याप ओमिक्रॉन विषाणूचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
आतापर्यंत १६ देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ वेरियंट संसर्ग पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिका, बॉट्सवाना, ब्रिटन, नेदरलंड, जर्मनी, हॉंगकॉंग, इटली, बेलजियम, इस्रायल, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, पोर्तुगाल आणि स्पेन या देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विरोधी पक्षांनी खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. विरोधकांनी मोठा गदारोळ केला. पण राज्यसभेचे सभापती एम. व्यकय्या नायडू यांनी त्यांनी मागणी फेटाळून लावली. यामुळे नाराज विरोधकांनी सभात्याग केला. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ‘ओमिक्रॉन’बाबत राज्यसभेत ही माहिती दिली.