बेशिस्त वाहन चालकांना दणका; राज्यात नवीन केंद्रीय मोटार वाहन कायदा

मुंबई: राज्यात नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याअंतर्गत बेशिस्त वाहनचालकांना अटकाव करण्यासाठी दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. राज्यातील वाढते अपघात आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन पाहता परिवहन विभागाने हा निर्णय घेतलाय.

नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास बाईकस्वारांना एक हजार रुपये, चारचाकी वाहन मालकांना दोन हजार रुपये इतका दंड आकारला जाणार आहे. इतकेच नाही तर पुढील तीन वर्षांच्या आत दुसर्‍यांदा किंवा त्यानंतरही पुन्हा गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तर विनालायसन्स वाहन चालविणार्‍यांकडून पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

तर धोकादायकरित्या वाहन चालविल्यास दुचाकीस्वाराला एक हजार रुपये, चारचाकी चालकाला तीन हजार रुपये तर अन्य वाहन चालकांना चार हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. तीन वर्षांत पुन्हा गुन्हा घडल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाईल. वाहनांना रिफ्लेक्टर नसणे, फॅन्सी नंबर प्लेट इत्यादीसाठी एक हजार रुपये दंड आकारला जाईल.

केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल करून नवीन कायदा आणला. त्यातील तरतुदींमुळे दंडाच्या रकमेतही मोठी वाढ केली. परंतु राज्यातील जनता त्याला विरोध करत असल्याचे कारण पुढे करत राज्य सरकारने त्याला विरोध केला. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या कायद्याला स्थगिती दिली होती. मात्र, सध्या राज्यात वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे, वारंवार नियमांचे उल्लंघन केले जात आहे. ज्यामुळे राज्यातील अपघातांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या कायद्याची अमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.