नितेश राणेंचं निलंबन झालं तर ही लोकशाहीची हत्या, देवेंद्र फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
मुंबई: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस सुरू असून, सभागृहात जोरदार गदारोळ झालाय. भाजप आमदार नितेश राणेंनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना म्याव म्याव करत हिणवल्याचे पडसाद सभागृहात पाहायला मिळत आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी नितेश राणेंचं निलंबन करण्याची मागणी केलीय, त्यालाच आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय. या सभागृहामध्ये हा नवा पायंडा सुरू झालाय, माननीय अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्यांकडे पाहायचंच नाही. ठरवून सगळ्या गोष्टी करायच्या. 12 निलंबित करायचे, मग अजून निलंबित करायचे हे दिसतंय. आम्हाला हरकत नाहीये, आम्ही लोकशाहीमध्ये लढणारे लोक आहोत, रडणारे लोक नाही आहोत. कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही सदस्यानं असं वागू नये. याच सभागृहामध्ये भुजबळ तिकडे बसायचे. भास्करराव जाधवांसहीत सगळे आम्ही इकडे बसायचो. भुजबळसाहेब आल्यानंतर हूप हूप करणाऱ्यांमध्ये भास्कररावसुद्धा होते. सभागृहानं या सगळ्या गोष्टी पाहिल्यात, त्याचंही समर्थन नाहीये, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
या सभागृहाबाहेर जी घटना घडली, त्याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण जर हे ठरवून आले असतील, त्या गोष्टीचा फायदा घेऊन एखाद्या सदस्याला निलंबित करायचं, तर हे लोकशाहीमध्ये योग्य नाही. 12 लोक आमचे तुम्ही निलंबित केले. आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. आम्हाला आनंद नाहीये. या सभागृहाच्या वर न्यायालयात जावं या मताचे आम्ही नाही. पण अध्यक्ष महोदय ही वेळ आमच्यावर तुम्ही आणताय. या ठिकाणी कायदा पाळला जात नाही, संविधान पाळलं जात नाही. मनमानीप्रमाणे एक एक वर्ष निलंबित करायचं. हे जे काही चाललेलं आहे, ते बरोबर नाही आहे. भास्कररावांनी सांगितल्यानंतर नितेश राणे जे बोलले ते चुकीचे असल्याची मी जाहीर भूमिका घेतली. माझा सदस्य असला तरी ही भूमिका घेण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय.