इतका अभ्यास बरा नाही, त्याचं ओझं झेपलं पाहिजे; संजय राऊतांचा राज्यपालांना चिमटा
मुंबई: विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीवर अभ्यास करून निर्णय देतो असं आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलं होतं. राज्यपालांच्या या आश्वासनावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. इतका अभ्यास बरा नाही. त्यांच ओझं झेपलं पाहिजे, असा चिमटा संजय राऊत यांनी राज्यपालांना काढला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. राज्यपाल आपले फार अभ्यासू आहेत. त्यांना प्रत्येक विषयाचा अभ्यास करावा लागतोय. इतका अभ्यास बरा नाही. त्या अभ्यासाचं ओझं झेपलं पाहिजे. इथे मुळात लॉकडाऊन काळात अभ्यास कमी झाला आहे. आता प्रत्येक गोष्टीत अभ्यास करायला लागलात. आपल्या संविधानात काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार काम करायचं आहे. घटनेत स्पष्ट लिहिलंय की मंत्रिमंडळाच्या शिफारशी तुम्ही मान्य करायच्या आहेत, असं राऊत म्हणाले.
आता 12 आमदारांच्या शिफारशी. त्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्या शिफारशी बंधनकारक आहेत. आपल्या संविधानात लिहिलं आहे. पण राज्यपालांचा अभ्यास सुरू आहे. शांतता अभ्यास सुरू आहे असं नवीन नाट्य राजभवनात सुरू आहे. आणि त्याचे पात्र जे आहे ते केवळ राज्यपालच नाहीत तर भाजपचे नेतेही त्या नाट्यात भाग घेत आहेत. आता काही दिवस नाटक चालेल. नाटक रंगू द्या. कारण आता 50 टक्के क्षमतेची आसन व्यवस्था असल्याने अशा प्रकारची नाटकं होतं असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.