राज्यात 24 तासांत 3, 900 कोरोनाबाधितांची नोंद, मुंबईत सर्वाधिक 2,510 रुग्ण
मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाने हातपाय पसरण्यास पुन्हा सुरुवात केल्यामुळे धास्ती आणखी वाढत चालली आहे. गेल्या काही महिन्यांपासून दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट पहायला मिळत होती. पण आता अचानक दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या तीन हजारांच्या पार गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता आणखी वाढली आहे. गेल्या 24 तासांत 3, 900 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकट्या मुंबईमध्ये 2,510 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईची रुग्णसंख्या पाहायला गेले तर एक दिवस आधी आढळलेल्या रुग्णांपेक्षा ही रुग्णसंख्या जास्त आहे.
28 डिसेंबरला महाराष्ट्रात 2,172 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर मुंबईत 1,333 रुग्णांची नोंद झाली होती. तर दुसऱ्या दिवशीच म्हणजे 29 डिसेंबरला रुग्णसंख्यात मोठी वाढ पहायला मिळाली. राज्यात 3, 900 तर मुंबईमध्ये 2,510 रुग्णांची नोंद झाली. या दोघांची तुलना केली तर 29 डिसेंबरची रुग्णसंख्या जास्त असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सरकारने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे याच पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इशारा देखील दिला आहे.
राज्य कोरोना टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, ‘दैनंदिन रुग्णसंख्या वाढली तरी सुद्धा रुग्णालयात दाखल होण्याची गरज लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. खबरदारी म्हणून नागरिकांनी नियमांचे पालन करणे खूपच गरजेच आहे. काही लक्षणं जाणवल्यास निदान आणि विलगीकरण आणि उपचारांना प्राधान्य दिले पाहिजे. सध्या संसर्गाच्या स्थितीचे विश्लेषण करण्यास 15 जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतरच अचूक आणि शास्त्रीय पद्धतीने तिसऱ्या लाटेचे विश्लेषण करता येणार आहे.’ दरम्यान, नववर्षाच्या स्वागतासाठी सरकारने आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत. गृहमंत्रालयाकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.