निर्बंध पाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पंतप्रधान, भाजप नेत्यांना द्यावेत – संजय राऊत

मुंबई: निवडणूक आयोगाने प्रचारावर काही निर्बंध घातले आहेत, ऑनलाईन प्रचार करा असे त्यांनी सांगितले आहे. पण हे कागदावर सगळे ठिक आहे. मात्र, निवडणूक आयोगाने याप्रकारचे स्पष्ट आदेश पंतप्रधान आणि भाजपच्या अध्यक्षांना द्यावेत. कारण त्यांच्यासाठी कोणते नियम नसतात. इतरांसाठी नियम असतात. हे आम्ही पश्चिम बंगालच्या निवडणुकीत बघितले आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या बाबतीत तरी समान कायदा असावा असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले की,  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर हा दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त आहेत. महाराष्ट्रात भायवह अशा प्रकारची स्थिती आहे. उत्तर प्रदेशमध्ये तर रुग्णांची नोंदच होत नाही, त्यामुळे पुढच्या महिनाभरात उत्तर प्रदेशमध्ये काय होईल हे सांगता येत नसल्याचे वक्तव्य राऊत यांनी केले. निवडणूक आयोगाने निवडणुका वेळेत जाहीर केल्या हे ठीक आहे, मात्र, लोकांचे आरोग्य, त्यांचा जीव महत्त्वाचा आहे, याचा विचार निवडणूक आयोगाने केला नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

तसेच काही दिवस निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात, पण काही जणांना निवडणुका उरकण्याची घाई झाल्याचे राऊत म्हणाले. निवडणुका होत असलेल्या ५ राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती चांगली नाही. त्यामुळे निवडणुक आयोगाने काही निर्बंध घातले आहेत. त्यांनी पंतप्रधान आणि भाजपच्या अध्यक्षांना, नेत्यांना निर्बंध पाळण्याचे आदेश द्यावेत असे राऊत म्हणाले.