राज्यात शरद पवार यांच्याइतका सेन्सिबल, विचारी, विवेकी आणि सांस्कृतिक क्षेत्राची जाण असणारा नेता नाही; शरद पवारांच्या भेटीनंतर किरण मानेंची प्रतिक्रिया
मुंबई: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने हे आपल्या सोशल मीडियावरील परखड मतप्रदर्शनामुळे नेहमीच चर्चेत असतात. याचमुळे त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी किरण माने म्हणाले की, राज्यात शरद पवार यांच्याइतका सेन्सिबल, विचारी, विवेकी आणि सांस्कृतिक क्षेत्राची जाण असणारा नेता नाही.
शरद पवार यांच्या भेटीनंतर किरण माने यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. मला भेटीसाठी अर्धा तास देण्यात आला होता. पण ही भेट एक-दीड तास चालली. यावेळी मी त्यांना माझी राजकीय भूमिका आणि माझ्यावर महिलेने केलेल्या तक्रारीसंदर्भातील सर्व पुरावे त्यांना दाखवले. त्यांनी माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतल्याचे किरण माने यांनी सांगितले.
तुमच्या बोलण्यानंतर शरद पवार यांनी काही प्रतिक्रिया दिली का, असा प्रश्नही किरण माने यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी म्हटले की, लगेच प्रतिक्रिया देणारे लोक उथळ असतात. तर शरद पवार हे सर्वकाही शांतपणे ऐकून घेतात. ते तुम्हाला खोचक प्रश्न विचारतात. मलाही त्यांनी दोन-तीन खोचक प्रश्न विचारले. त्यावरुन ते तुम्ही किती पाण्यात आहात, हे जोखतात. मी त्यांच्यासमोर माझी बाजू मांडली आहे. मला त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा नाही. पण आता ते हे सर्व कशा पद्धतीने मांडतात, हे बघुयात, असे किरण माने यांनी सांगितले.