उद्धव ठाकरे आणखी काही जण सोडून जाण्याच्या भीतीमुळेच जोरदार भाषणे करत आहे; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
औरंगाबाद: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात प्रथमच गोरेगाव येथे जाहीर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. तसेच भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना खास त्यांच्या अडनावरुन लक्ष केले आहे. मात्र त्यानंतर भाजपकडून सुद्धा उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. औरंगाबाद येथे पुन्हा एकदा भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आणखी काही जण सोडून जाण्याच्या भीतीमुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता जोरदार भाषणे करत आहेत. तसेच शिवसेनेला आणखी खिंडार पडणार आहे. त्यामुळेच शिंदे गटातील काही जण नाराज असल्याची अफवा पसरवली जात आहे. मात्र, असे काहीही नाही. जुन्या सरकारपेक्षा आताचे सरकार कधीही चांगले, अशीच आता जनतेची व आमदारांचीही भावना आहे.
यावेळी त्यांनी शिवसेनेच्या जन आक्रोश मोर्चावरही टीका केली. शिवसेनेला जन आक्रोश मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. ते इव्हेंट मॅनेजमेट करत आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे पक्षात नाराज नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. पुढे म्हणाले, शिवाजी पार्क बाबत न्यायालय जो निर्णय घेईल तो मान्य असायला हवा. मोदी आणि शहा याना बोलावलं असेल तर आनंदच आहे, असंही त्यांनी सांगितलं. समाजामध्ये विश्वास निर्माण करणे हे आमचं काम आहे. काँग्रेसने मुस्लिम समाजात भीती केलेली. आम्ही विश्वास निर्माण करण्यासाठी हे करतोय. मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.