महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतर कसबा व चिंचवड पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे – अजित पवार

2
महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतर कसबा व चिंचवड पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांसमोर मांडली. निवडणूक सहजतेने घेतली तर सोपी नाही पण कष्ट आणि मेहनत घेतले तर अवघडही नाही, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला. सहानुभूतीचा मुद्दा घेऊन राजकारणाचा प्रयत्न होत असेल तर यापूर्वी पंढरपूर, कोल्हापूर, देगलूरची निवडणूक लढवण्यात आली, याची आठवणही अजित पवारांनी करून दिली.
अजित पवार यांनी म्हटले कि, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच पिंपरी-चिंचवड या भागातून झाली. बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यावेळी देशात काँग्रेस पक्षामध्ये सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आलो तेव्हापासून माझे व या शहराचे नाते आहे. या शहराच्या जडणघडणीत आम्ही १९९१ सालापासून योगदान दिले असून आमच्यापरीने या भागाचा निश्चितपणे कायापालट केला आहे, असे ते म्हणाले.
आदरणीय पवार साहेबांच्या दूरदृष्टीनेच हिंजवडी येथील आयटी पार्क उभे राहिले, पाणी, रस्ते व इतर अनेक प्रकल्प उभे करण्यासाठी निर्णय घेतले, पूर्वीच्या काळात छोट्या गावांचे नगरपालिकेत त्यानंतर महानगरपालिकेत रुपांतर झाले, हे होताना काही काळा आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून या शहराला ओळख मिळवून दिली, जवळपास २५ वर्ष निर्विवाद बहुमत आम्ही मिळवत होतो, या लक्षणीय कामगिरीची अजित पवारांनी आठवण करून दिली.
या भागात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मानणारा मतदार आहे. त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीत मी स्वत: तसेच इतर मित्रपक्षांच्या नेत्यांकडून गंभीरपणे लक्ष दिले जाईल, असा दृढ विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.