दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा, चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय

33

पुणे :
पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच मोरया गोसावी देवस्थान परिसर विकासासाठी निधी देण्याच्या हि सूचना पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्य शासनाची ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेची संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी; यासाठी प्रत्येक तालुक्यात किमान 10 ठिकाणचा गाळ काढण्याच्या सूचना या बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आल्या, याशिवाय जिल्हा परिषद शाळा, रस्ते आणि अंगणवाड्यांचा विकास, पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली गावांसाठी सुविधा, पोलिस दलाचे अद्ययावतीकरण करणे, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळावी आदी विषयांवर या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. गडकिल्ले सुशोभीकरणासाठी पुरातत्व खात्याच्या माध्यमातून दुरुस्ती करण्याच्या कामासाठी ४२ कोटी रुपयांची तरतूद यावेळी करण्यात आली त्यासोबतच सीएसआरच्या माध्यमातूनही निधी उभारला जाणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

या बैठकीला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, यांच्या सह जिल्ह्यातील आमदार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.