शिवाजी विद्यापीठाचे समस्या तातडीने सोडवा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे महापालिकेला निर्देश
मुंबई : शिवाजी विद्यापीठ येथील विविध प्रलंबित विविध सुविधा विषयक समस्या कोल्हापूर महानगरपालिका यांनी परस्पर समन्वयातून तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
मंत्रालयात दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आयोजित संयुक्त बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार अमल महाडीक, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, शिवाजी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव संतोष खोरगडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विद्यापीठ परिसरातील विविध नागरी व पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी महापालिकेने विद्यापीठाला नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवावा, डीपी रोडचे काम तातडीने हाती घ्यावे तसेच विद्यापीठाच्या संरक्षण भिंतीचे काम गतीने पूर्ण करावे, अशा सूचना दिल्या.
ज्या विकासकामांसाठी शासनस्तरावर मंजुरी आवश्यक आहे, त्या संदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विद्यापीठ परिसरातील घनकचरा नियमितपणे उचलण्याबरोबरच विद्यापीठातील तलावाचा गाळ काढण्यासाठी जागतिक बँकेच्या उपक्रमांतर्गत योजना राबविण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यासही त्यांनी सांगितले.
विद्यापीठ आणि महानगरपालिका यांच्यातील प्रश्न परस्पर समन्वयातून सोडवून विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यावर बैठकीत भर देण्यात आला. विकासकामांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी संबंधित विभागांनी सातत्याने पाठपुरावा करावा, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.