”त्यांना” चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? …..संभाजी भिडेंवर झालेल्या कुत्र्याच्या हल्ल्यानंतर अमोल मिटकरींची मिश्किल प्रतिक्रिया

मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर सोमवारी एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. या घटनेत त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेवरून समाज माध्यम X वर एक पोस्ट केली आहे. या पोस्टवरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे.
सांगली येथील माळी गल्लीतून जात असताना संभाजी भिडे यांच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर त्यांना सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. अमोल मिटकरी आणि संभाजी भिडे यांमध्ये यापूर्वीही शब्ब्दिक वाद आपल्याला पाहायला मिळाले आहेत. संभाजी भिडे यांच्या विधानावर यापूर्वी सुद्धा अमोल मिटकरी यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिलेली आहे. आता मिटकरी यांनी केलेल्या या X पोस्टवरून पुन्हा एकदा चर्चा रंगणार हे नक्की.
मिटकरी नेमकं आपल्या पोस्ट मध्ये काय म्हणाले ?
“त्यांना” चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? …..जो कुणी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालला पाहिजे. चावतो म्हणजे काय? मुगलाई लागलीय का?, अशी मिश्कील प्रतिक्रिया मिटकरी यांनी दिली आहे. या पोस्टवरून शिवप्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधकांमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.